प्रियश्री डाॅ.स्वप्नील,
तुमच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान आणि कुशल शल्यविशारदाच्या हस्ते ०८ जुलै २०१९ ला माझा पुनर्जन्म झाला.
व्यावसायिक नैपुण्य, कुशाग्र बुद्धिमत्ता, रुग्णाप्रतीची बांधिलकी, अथक परिश्रमाची क्षमता व तयारी आणि याच्या जोडीला अत्यंत दुर्मिळ होत चाललेल्या माणुसकीचं जे दर्शन मला तुमच्यामधे घडलं ते थक्क करणारं होतं.
तुम्ही, डाॅ.विनया, डाॅ. अमित हब्बु यांच्या रुपाने
परमाम्याने देवदूतांची एक पूर्ण तुकडीच पृथ्वीवर पाठवली आहे.
ज्यांच्या गाठी सद्गुरुंच्या कृपाशिर्वादाचं,किंवा आणि काहीं पुण्य असतं त्यांच्या केसिस तुमच्याकडे येतात अशी माझी खात्री आहे.
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्याकडून हे पुण्यकर्म घडत राहो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना.
आमच्या घरातील प्रत्येकाला, आज प्रामुख्याने तुमची आठवण येऊन ऊर भरून येतो आहे.
मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्या निपुण हातात पुष्पगुच्छ द्यायची मनस्वी इच्छा होती.पण सद्य परिस्थितीचा विचार करून साऱ्यांनीच मला परावृत्त केलं.
म्हणून आम्हा सर्व कुटुंबियांतर्फे, कृतज्ञतेची ही शब्दसुमनं तुम्हाला माझ्याकडून समर्पित.
“ आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें ।”
सुरेश शंकर ऊर्फ माधव रानडे.